दिवाळीपूर्वी एफडीएची राज्यभर धडक,

0
3

 १६.९२ कोटींचा भेसळयुक्त माल जप्त

६८ आस्थापनांचे परवाने निलंबित; सात उत्पादन युनिट्सना टाळे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत १६.९२ कोटी रुपयांचा संशयास्पद व भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेतून प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, नियमभंग करणाऱ्या सात उत्पादन युनिट्सना टाळे ठोकण्यात आले आहे.

दिवाळीत मिठाई, खवा, दूध, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात येण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून तपासणी आणि कारवाई केली जात आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या मोहिमेचा उद्देश आहे. नागरिकांनी मिठाई व अन्य खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादन व अंतिम मुदत तपासावी. संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here