तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांना एकाकी पाडण्याचा डाव खेळला जात आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेली ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसचा बहुतांशी गट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांच्या दावणीला बांधला गेल्याचे दिसून येत आहे. सोमवारी मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदिप माने यांच्यासह शिवसैनिकांनी संजय पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. तर काँग्रेसचा एक गट अगोदरपासूनच पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संजय पाटील यांच्यामध्ये होत आहे. या मतदारसंघात स्व. आर. आर. पाटील व संजय पाटील यांच्यातील कडवा, पराकोटीचा राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिला आहे. संजय पाटील ज्यावेळी खासदार झाले, त्यावेळी या दोन्ही गटातील संघर्षाला थोडासा पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येत होते. दोन्ही गटांनी राजकीय सेटलमेंट करून या संघर्षाला मुठमाती दिली होती. मात्र तासगाव बाजार समिती, कवठेमहांकाळ नगरपंचायत व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील संघर्ष पुन्हा उफाळून आला. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष आणखीनच तीव्र होताना दिसत आहे.
लोकसभेच्या धक्कादायक पराभवानंतर संजय पाटील यांनी तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीचा 'जुगार' खेळण्याचे ठरवले आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. तत्पूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकला. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे तासगाव - कवठेमहांकाळचा 'सामना' आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये रंगत आहे. या ठिकाणी पूर्वीपासूनच दोन्ही गट तुल्यबळ आहेत. मात्र दोन्ही गटातील संघर्षामध्ये नेहमी आर. आर. पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचा विजय होत आला आहे. संजय पाटील यांना मात्र आर. आर. पाटील कुटुंबीयांविरुद्ध कधीही निवडणूक जिंकता आला नाही. त्याची सल त्यांच्या मनामध्ये कायम आहे.
दरम्यान, लोकसभेच्या पराभवानंतर आता तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, या इराद्याने संजय पाटील गट पेटून उठला आहे लोकसभेला झालेल्या चुका टाळून विधानसभेचा प्रचार सुरू आहे. संजय पाटील स्वतः गावागावात, घराघरात पोहोचत आहेत. त्यांच्या गटात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. त्यातच तिसऱ्या आघाडीचे माजी राज्यमंत्री अजित घोरपडे, स्वप्निल पाटील, आर. डी. पाटील यांच्यासह अनेकांनी संजय पाटील यांच्याशी संधान साधले आहे. परिणामी संजय पाटील यांची ताकद वाढल्याचे दिसत आहे.
रोहित पाटील यांना मात्र एकाकी पाडण्याची चाल विरोधकांकडून खेळली जात आहे. रोहित पाटील गट जास्तीत जास्त खिळखिळा करून त्यांचे नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तासगाव - कवठेमहांकाळमधील महाविकास आघाडीही एकसंघ नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.
तासगावमधील शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी सोमवारी मध्यरात्री संजय पाटील यांची भेट घेतली. आपल्या सोबतच्या शिवसैनिकांसह त्यांना जाहीर पाठिंबा दिला. तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील हे तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीपासून संजय पाटील गटाशी संधान साधून आहेत. त्यांचा गटही लोकसभेच्या निवडणुकीत संजय पाटील यांचाच प्रचार करताना दिसून येत आहे.
त्यामुळे तासगाव - कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष रोहित पाटील यांच्यापासून दूर गेल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. परिणामी, रोहित पाटील यांना एकाकी ही निवडणूक लढवावी लागेल, असे दिसत आहे. तरीही नेते एका बाजूला गेले तरी जनता माझ्यासोबत आहे. सामान्य लोकच माझी ताकद आहे. सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे कोण कुठेही गेले तरी सामान्य लोक छातीचा कोट करून माझ्यासाठी लढतील, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तर जे - जे नाराज आहेत त्यांची येत्या काही दिवसांमध्ये समजूत काढली जाईल. ते आपल्या बाजूने कसे येतील, यासाठी प्रयत्न केले जातील, असे रोहित पाटील समर्थकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान ही निवडणूक अतिशय चुरशीची, रंगतदार होण्याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळत आहेत. दोन्ही गटांनी पूर्ण ताकद लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेचा गड सर करायचा या इराद्याने दोन्ही गट पेटून उठले आहेत. साम - दाम - दंड - भेद या सर्व गोष्टींचा अवलंब करून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येथील लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.