महाराष्ट्राचा जेव्हा राजकीय इतिहास लिहिला जाईल तेव्हा स्व. आर. आर. पाटील यांचे नाव इमानदार, प्रामाणिक राजकारणी म्हणून घेतलं जाईल. रोहित हा आर. आर. पाटील यांचा मुलगा आहे. त्यामुळे तो चुकीचं काहीच करणार नाही. त्याच्याविरोधातील भाजप महायुतीला पैशाशिवाय काही दिसत नाही. त्यामुळे त्याच्यावर पैसे वाटपाचा विनाकारण आरोप केला जात आहे. हे दुर्दैवी आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर लढत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील हे रणांगणात उतरले आहेत. अतिशय चुरशीची अशी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे येथील निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, रविवारी रात्री रोहित पाटील समर्थक साठेनगर भागात पैसे वाटप करत असल्याचा आरोप संजय पाटील समर्थकांनी केला. सचिन पाटील व खंडू कदम या दोघांना पैसे वाटप करत असताना रंगेहात पकडले. यातील खंडू कदम पळून जाण्यात यशस्वी झाला. तर सचिन पाटील यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख तीन हजार पाचशे रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
तासगाव - कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांचा जनाधार घसरत आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणूनच ते पैसे वाटून मते खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय पाटील समर्थकांनी केला आहे. या पैसे वाटप प्रकरणामुळे राज्यभरामध्ये खळबळ उडाली होती.
मात्र आता या पैसे वाटप प्रकरणांमध्ये नवीन ट्विस्ट समोर आला आहे. संबंधित पैसे वाटप करणाऱ्या सचिन पाटील यांनी तासगाव पोलिसांसमोर जबाब दिला आहे. त्यामध्ये हे पैसे दुधाचे होते. साठेनगर भागातील लोक आमच्या शेतात मजुरीस येतात. भाऊबीजनंतर मी त्यांना दिवाळीचा फराळ द्यायला गेलो होतो, असा जबाब पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये नवीन ट्विस्ट तयार झाला आहे.
तर रोहित पाटील यांनी यापूर्वीच विरोधकांनी मला बदनाम करण्याच्या हेतूने हे षडयंत्र रचले आहे. यापूर्वी आर. आर. पाटील हयात असताना त्यांनाही विरोधकांनी अशाच प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची ही जुनी सवय आहे. या प्रकरणाची पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी, असा पलटवार केला आहे.
दरम्यान, याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, भाजप महायुतीला पैशाशिवाय काही दिसत नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा जेव्हा - जेव्हा राजकीय इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आर. आर. पाटील यांचे नाव इमानदार, प्रामाणिक राजकारणी म्हणून घेतले जाईल. रोहित पाटील हा आर. आर. पाटील यांचा मुलगा आहे. तो कधीच काही चुकीचे करणार नाही, याचा मला विश्वास आहे. रोहीतचा मला सार्थ अभिमान आहे.