‘
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकणार आहे. या मतदारसंघामध्ये विकासगंगा वाहण्यासाठी आणि नवे विकासपर्व सुरू करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी केले.
कवठेमहांकाळ येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी तासगाव कवठेमहांकाळच्या माजी आमदार सुमन पाटील, काँग्रेसच्या शैलजा पाटील, जयसिंग शेंडगे, अनिता सगरे, सुरेश पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रोहित पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक असा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून तासगाव - कवठेमहांकाळची ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, द्राक्ष खरेदी - विक्री केंद्र उभारणी, बेदाणा निर्मिती केंद्रामधील आधुनिकीकरण, त्याचबरोबर रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे.
आपला सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत आवाज उठवण्यासाठी संधी आपण देणार आहात, याची खात्री आहे. स्व. आर. आर. पाटील यांच्या स्वप्नातील अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आपण मला बळ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुरवातीला स्व. चंद्रकांत हाक्के यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.