जिल्ह्याभर अवैध धंद्यावर पोलीसांची करडी नजर | वाळेखिंडीत अवैध दारू साठ्यावर,कोकळेनजिक सुगंधी तंबाखूच्या वाहतूकीवर छापा

0
218

विधानसभा निवडणूरीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात पोलीसाकडून अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे- रांजणी रस्त्यावर अवैधरित्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकत साताऱ्यातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू, इनोव्हा कार असा १२.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ललित सुमेरमल कच्छिया (वय ५७, रा. बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात दोन देशी बनावटीची पिस्तूल, एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन, ८ काडतुस घेऊन विक्रीसाठी आलेल्या धुळे येथील तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

यासिन उर्फ सोनू शगीर मेहतर (वय २३, रा. भंगार बाजार, धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाळेखिंडी (ता.जत) येथे विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करून २०० बॉक्स दारू उतरत असताना केलेल्या कारवाईत १५ लाख १६ हजार रुपये किमतीची विदेशी दारू व ५ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा २० लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या पथकाने

सोमवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या कारवाईत सुरेश गणपती खोत (रा. माळवाडी, कोल्हापूर), धोंडिराम शिंदे (रा. वाळेखिंडी) यांच्यासह जत येथील एका वाईन शॉपचा मालक, बाबर या नावाची व्यक्ती अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

एका टेम्पोतून वाळेखिंडी येथील धोंडिराम शिंदे याच्या घरात दारू उतरवली जात असल्याची माहिती मिळाली.सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी शिंदे याच्या घरी छापा टाकला.

त्यावेळी १५ लाखांचे विदेशी दारूचे २०० बॉक्स सापडले. अधिक चौकशी केली असता, शिरोली एमआयडीसीतील एका ट्रेडमधून व मिरजमधील एका ट्रेडमधून ही दारू आणल्याचे त्याने सांगितले. दोन्हीही दारू दुकान मालकांनी परवाना दिलेल्या जागेत दारूचा साठा न करता एका खासगी व्यक्तीच्या घरात साठा करत असल्याचे दिसून आले. शिंदे याच्या घरात हिरा वाईन शॉप व वाळेखिंडी येथील बाबर या दुकान मालकाच्या संगनमताने ही दारू आणल्याचे स्पष्ट झाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here