घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथे अतुल शिंदे यांच्या घराचा पाया काढताना जुन्या काळातील धान्य साठविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पेवाचे दर्शन झाले. ते पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. हे पेव अद्याप सुस्थितीत असल्याचे दिसून येते.
पेव म्हणजे पाणी झिरपून आत येणार नाही, असे धान्य साठविण्यासाठी जमिनीत दगड चिकणमातीपासून तयार केलेले तळघर, पेवामध्ये ठेवलेले धान्य उंदीर, घुशी, कीड व ओलाव्यापासून अतिसुरक्षित राहाते. वर ठेवले की, धान्य खराब होते. पेव तयार करण्यासाठी गोलाकार खड्डा खणत व चारी बाजूंनी दगड व चिकणमातीने बांधून घेत. चिकणमाती ही पाण्याने ढासळत वा पाझरत नाही.
या पेवात उतरण्यासाठी दोरखंडाचा वापर केला जात असे. काही ठिकाणी दिवळ्यावजा रिकाम्या जागाही ठेवल्या जात असत. त्याचा काही वेळा पेवात चढण्या, उतरण्यासाठी किंवा दिवाबत्ती ठेवण्यासाठी उपयोग केला जात असे. धान्य पेवात ठेवण्यापूर्वी त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून घेऊन कडूनिंबाचा पाला मिश्रण केला जात असे.
घाटनांद्रे येथे आढळलेल्या या पेवाची खोली तेरा फूट असून, तळाची रुंदी पाच फूट इतकी आहे, ती निमुळती होत तोंडाजवळ दीड फूट इतकी झाली आहे. हे पेच झाकण्यासाठी एका दगडापासून तयार केलेले दगडी झाकण बनविले आहे. हे झाकण पेवाचे संरक्षण करते.