खासगी रुग्णालयात नातेवाईकांच्या उपचारासाठी सांगलीत आलेल्या गोवा येथील युवकाचा बुधवारी दुपारी कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. सुदीप बसाप्पा मादर (वय १७, रा. वास्को, गोवा) असे मयत युवकाचे नाव आहे. आयुष हेल्पलाईन व स्पेशल रेस्क्यु पथकाने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केला. याबाबत सांगली शहर पोलिसांत नोंद झाली आहे.
गोवा येथील सुदीप मादर हा त्याचा दाजी प्रशांत मादर याच्यासह मंगळवारी रात्री दहा वाजता सांगलीत आला होता. दाजी प्रशांत मादर याचा काही महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. गोव्यातून तो उपचारासाठी सुदीपसोबत सांगलीत आला होता. दोघांनी रात्री रेल्वे स्टेशनवरच मुक्काम केला.
बुधवारी सकाळी ते खासगी रुग्णालयात गेले. तेथून ते परत रेल्वे स्टेशनवर आले. गोव्याला जाण्यासाठी रात्री दहा वाजता रेल्वे असल्याने ते परत शहरात आले. दुपारी ते गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले. तेथून ते कृष्णा नदीकाठावर गेले होते. यावेळी दाजी प्रशांत हा काठावर मोबाईलवर बोलत बसला होता. तर सुदीप हा आंघोळ करून येतो म्हणून पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते काही काळात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, रुद्र कारंडे, चिंतामणी पवार, सूरज शेख यांच्यासह स्पेशल रेस्क्यु पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने नदीपात्रात शोध घेऊन सुदीपचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुदीपच्या कुटूंबियांना घटनेची माहिती दिली. या घटनेने कुटूंबियांनाही मोठा धक्का बसला होता. पोलिसांनी पंचनामा केला असून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.