बँकेने हात झटकले : कष्टाचे पैसे गेल्याने शेतकरी हवालदिल
लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी सचिन दगडू लेंगरे यांच्या बँक खात्यातून बुधवारी रात्री १:४२ वाजता एक लाख रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली.
गुरुवारी सकाळी मोबाइलमधील मेसेज पाहिल्यानंतर हा प्रकार समजल्यावर लेंगरे यांनी तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधला असता बँकेने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणुकीबाबात पोलिस यंत्रणेच्या सायबर विभागाकडे तक्रार देण्यास सांगत हात झटकले आहेत. दरम्यान, लेंगर यांनी सायबर खात्याकडे ऑनलाइन तक्रार नोंद केली आहे.
याबाबत डाळिंब उत्पादक शेतकरी सचिन दगडू लेंगरे यांनी दिलेली माहिती अशी की, दिवाळीमध्ये त्यांनी आपल्या शेतातील डाळिंब व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्या डाळिंबाचे त्यांना व्यापाऱ्याने दोन लाख १२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले होते. त्या एकूण २ लाख १२ हजार रुपये रकमेपैकी त्यांच्या बँक खात्यातून दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १:४२ वाजता अचानक एक लाख रुपये गायब झाले असून, ही बाब त्यांना दि. १४ रोजी सकाळी लक्षात आली.
याबाबत त्यांनी तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधला असता त्यांना ते पैसे एका व्यक्तीच्या खात्यावर गेले आहेत. मात्र, त्याची माहिती बँकेने देण्यास नकार देत तुम्ही सायबर क्राईमकडे तक्रार करा, असा सल्ला देऊन बँकेने याबाबत हातवर केले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दिली.
सायबर क्राईम विभागाकडे तक्रार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली असून, पुढील कारवाईसाठी आटपाडी पोलिस ठाण्यात संपर्क करा, असा मेसेजही त्यांना त्यांच्या मोबाइलवर देण्यात आला. याबाबत त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता अद्याप त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.