जत : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जत तालुक्यातील तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, जत पोलीस ठाणे हद्दीतील बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे, उमदी पोलीस ठाणे हद्दीतील श्रीमंत रामा करपे व नवनाथ आमगोंडा कराडे यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली.
जत उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या हद्दीतून ६ महिन्यांसाठी हद्दपार आदेश पारित केला आहे. गुन्हेगारांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई केलेली आहे. बंडा ऊर्फ राहुल शिवाजी वाघमारे, (रा. निगडी कॉर्नर, जत) याच्याविरुध्द गर्दी, बेकायदेशीर जमाव जमवणे, सावकारी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार श्रीमंत रामा करपे (रा. पांढरेवाडी, ता. जत) याच्या विरुद्ध शस्त्रानिशी गंभीर दुखापत, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर शस्त्र घातक जवळ बाळगणे, शासकीय कामात अडथळा करणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच नवनाथ आमगोंडा कराडे (रा. तिकोंडी, ता. जत) याच्याविरुध्द खंडणी, अपहरण, दुखापत, गंभीर दुखापत, बंदिस्त जागेतून चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.