लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार संतोष नारायण वाघमोडे (वय ४०, रा. महसूल कॉलनी, शामरावनगर) व धनंजय शैलेश भोसले (वय २५, रा. डायमंड वाइन शॉप मागे, बसस्थानक रस्ता, सांगली) या दोघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.
संतोष वाघमोडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. निवडणूक काळात त्याच्या सांगलीतील वास्तव्यामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शहर पोलिसांनी अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर प्रांताधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन वाघमोडे याला तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.
दुसऱ्या कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगार धनंजय भोसले याच्या विरुद्धदेखील शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने हद्दपारीसाठी प्रस्ताव पाठवला होता. अधीक्षक घुगे यांनी तो प्रांतांकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी होऊन भोसलेला सहा महिन्यांसाठी हद्दपार केले. महादेव पोवार, गौतम कांबळे, योगेश सटाले, अमोल ऐदाळे, दीपक गटे आदींच्या पथकाने प्रस्ताव बनवला.