मतदानासाठी प्रशासन सज्ज : मतदान यंत्रे आज केंद्रांवर होणार रवाना जिल्ह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; गाठीभेटींवर जोर !

0
106

जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संपली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी गाठीभेटींवर जोर दिला जाणार आहे. दि. २० रोजी मतदान असून प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघातील ३१६५ मतदान केंद्रांवर साहित्य पोहोच झाले असून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट आदल्या दिवशी नेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून विधानसभेची धामधूम सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी ५ वाजता झाली. त्यानंतर गुप्त खलबते आणि भेटीगाठीला वेग आला आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, रॅली, कोपरा सभांना जोर आला होता. एकेका दिवशी पाच ते सहा कोपरा सभाही अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या दुय्यम फळीतील नेत्यांनी गावा-गावात घेतल्या.

अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, शहरातील प्रभागात नेत्यांची कोपरा सभा व्हावी, यासाठी प्रयत्न करत होते. गावोगावच्या कार्यकत्यांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अनेक गावांत दररोज जेवणावळी होत आहेत. मतदारांना आमिष दाखवण्याचेही प्रकारही आता समोर आले आहेत. यामुळे हे दिवस निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा, उत्पादन शुल्क विभाग व सर्व प्रशासन डोळ्यात तेल घालून आचारसंहितेचा भंग होऊ नये,यासाठी दक्ष आहे. भरारी पथकांनी जिल्ह्यात अनेक कारवाई केल्या आहेत. आतापर्यंत राजकीय सभांवरही निवडणूक आयोगाची नजर होतीच आता उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालींवरही मतदानादिवशी वेब कास्टिंगद्वारे करडी नजर राहणार आहे.

सोशल मीडियाचा अपक्षांना आधार या निवडणुकीत उमेदवारांनी सोशल मीडियाचा मोठा वापर केला. वेगवेगळ्या स्वरूपाच्या विडंबन गाण्यांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट कार्यकर्त्यांकडून व्हायरल होवू लागल्या आहेत. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही कसर उमेदवारांनी सोडलेली नाही. मोठ्या पक्षांसारखी प्रचार यंत्रणा नसल्यामुळे छोट्या पक्ष आणि अपक्षांकडून सोशल मीडियावर भर दिला जात आहे.

प्रशासनाचे १८ हजार कर्मचारी व्यस्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपमुख्य निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आणि २६ नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुमारे १८ हजार अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here