निवडणूक काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ, ऑडिओ टाकल्याप्रकरणी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार माजी नगरसेवक निमेश नायर यांनी शहर पोलिस स्थानकात दिली आहे. निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्यानंतर पोलिसांनी एक पत्रक जाहीर केले होते. यामध्ये त्यांनी सोशल मीडियावर कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन केले होते.
मात्र, त्यानंतरही या तरुणाने आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याने मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ पोस्ट केल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३, १७५, ३५६(२), लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या तीन ऑडिओ, व्हिडीओ क्लिप अजून कुणी प्रसारित केल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची वर्तविण्यात येत आहे.