जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी विकासाच्या व पाण्याच्या मुद्द्यावरून न होता जाती, पातीचे राजकारण चांगलेच पेटले. दरवेळी निवडणूक म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर व जत साखर कारखान्यावर होत होती. आत्ता मात्र उपरा व भूमिपुत्र जात, पात यावर ही निवडणूक लढविली गेली.
भाजपा पक्षाने बाहेरचा उमेदवार लादला म्हणून इच्छुक उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांनी अपक्ष लढविण्याचे ठरविले, तर दुसरे इच्छुक उमेदवार जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांना पाठिंबा दिला.त्यामुळे तिरंगी सामना झाला.
दरवेळी म्हैसाळ योजना व जत साखर कारखाना यावर निवडणूक लढविली जायची.लिंगायत समाजाचे धर्मगुरुवर प्रचार करीत असल्याच्या कारणावरून जातीचे राजकारण पेटले. त्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी दुपारी तम्मनगौडा रवी पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर रोष निर्माण केला.त्यामुळे जातीचे राजकारण पहिल्यांदाच जत तालुक्यात पेटले. जत तालुक्यात धनगर समाज पहिल्या क्रमांकावर आहे. तर लिंगायत समाज दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन समाजात यामुळे तेढ निर्माण झाली.परिणामी शेवटपर्यत संघर्षाचा सामना झाला.
धनगर समाज आ.गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने तर लिंगायत समाज तम्मनगौडा रवी पाटील यांच्या पाठीशी राहिल्याचे प्राथमिक चित्र आहे.यामुळे सोशल मीडियावर उलट, सुलट टीका टिप्पणीदेखील वाढल्या. पूर्वी निवडणूक लाखात गुंडाळली जायची. यावेळी मात्र उमेदवारांकडून पैसे वाटप केल्याच्या आरोप पत्यारोप झाले.
आमदार कोण याकडे लक्ष
जत तालुक्यात धनगर, लिंगायत समाज तेढमुळे यातून उरलेली, मुस्लीम व मागासवर्गीय समाज कुणाच्या बाजूने जातो, यावर जत तालुक्याचा आमदार कोण होणार ते अवलंबून आहे.यंदाचा तीव्र संघर्षामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात याचा थेट अंदाज बांधणे राजकीय तज्ञ्यांना कठीण ठरत आहे.