मी परत येईन,मी परत येईन… असे ठाम आत्मविश्वासाने सांगणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील की नाही, याचा निर्णय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. मात्र, अमित शाह यांना पुष्पगुच्छ देतानाची फडणवीस यांची हसतमुख मुद्रा आणि एकूणच आत्मविश्वासपूर्ण वावर, यामुळे फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचा अंदाज जाणकारांनी लावला आहे.
यामुळे शुक्रवारी मोदी, शाह यांच्यात चर्चा झाल्यानंतर मोदींनी त्यांचे लाडके शिष्योत्तम फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवल्याची घोषणा शुक्रवारी मुंबईत दाखल होणाऱ्या भाजप निरीक्षकांकडून होणे अपेक्षित आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यावर अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी फडणवीस यांचे नाव नक्की असले तरी मोदी-शाह हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. संघासह अनेक आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्यानंतरही राजस्थान, मध्य प्रदेशसारखे मोदी-शाह महाराष्ट्रातही नवा प्रयोग करताना ऐनवेळी अनपेक्षित नाव तर समोर आणणार नाहीत ना, याची धास्ती भाजपमध्ये आहे.
मात्र, मोदी-शाह यांनीच फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याचा निर्णय केल्याचे सांगितले जाते. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींची आहे. त्यामुळे शिंदे हे नव्या सरकारमध्ये असतील असे बोलले जाते. दुसरीकडे, शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यास काय? यावरही या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.गुरुवारी रात्री दिल्ली गाठली.
अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील सोमवारी दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांना भेटण्याआधी खलबते केली. विमानतळावरून शिंदे थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी गेले आणि या दोघांनी चर्चा केली. यानंतर अजितदादा आणि फडणवीस तेथे पोहोचल्यावर हे तिन्ही नेते आणि अमित शाह यांच्यामध्ये रात्री साडेदहानंतर सुमारे दीड तास चर्चा झाली.
शिंदे गंभीर, तर फडणवीस हसतमुख
दिल्लीत दाखल झाल्यावर विमानतळावरून निघालेल्या एकनाथ शिंदे यांची एकूण देहबोली ही गंभीर होती. चेहऱ्यावर अजिबात हास्य नव्हते. अमित शाह यांच्याशी चर्चेप्रसंगी अजित पवार, फडणवीस यांनी हसतमुखाने शाह यांना पुष्पगुच्छ दिले. मात्र, या वेळीही शिंदे यांचा चेहरा गंभीर आणि उदासच दिसत होता. फोटोतही ते जरासे बाजूलाच आणि त्रयस्थासारखे उभे होते. फडणवीस मात्र एकदम उत्साही आणि हसतमुख दिसत होते. यावरूनच फडणवीस यांचे नाव क्लिअर झाल्याचा अंदाज जाणकारांनी केला.