७० टक्के भारतीय ‘नको ते’ पाहतात मोबाईलवर पोर्न इंडस्ट्रीची उलाढाल साडेआठ हजार कोटींची
मुलांना लैंगिक शिक्षण दिले जावे, असे नुसते म्हटले तरी अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागणारे भारतीय ‘पोर्न’चे मात्र प्रचंड चाहते आहेत, ‘पोर्न’ पाहण्याला दैनंदिनीचा भाग करून त्यांनी जगात सर्वाधिक ‘पोर्न’ पाहिले जाणाऱ्या देशांत भारताला थेट तिसऱ्या क्रमांकावर नेले आहे.
हातोहाती मोबाईल आल्यापासून भारतात पोर्न कंटेंट पाहण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचे मानले जाते. पोर्न इंडस्ट्रीचे केंद्र असलेली अमेरिका पोर्न पाहण्यात सर्वात पुढे असून, ब्रिटन दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत लोकसंख्येबाबत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून, लोकसंख्यावाढीचा वेग पाहता तो आगामी काही वर्षांत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याची शक्यता आहे. एक तर प्रचंड लोकसंख्या आणि हातोहाती स्मार्टफोन, यामुळे भारत पाश्चात्त्य पोर्न इंडस्ट्रीसाठी मोठी बाजारपेठ बनला आहे.
एका सव्र्व्हेनुसार, भारतात २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण सर्वाधिक (३४ क्के) पोर्न पाहतात. त्याखालोखाल १८ ते २४ वयोगटातील २४ टक्के तर ३५ ते ४४ वयोगटातील १७ टक्के लोक मिटक्या मारत ‘तो’ कंटेंट पाहतात. स्मार्टफोनवर सर्वाधिक (७० टक्के लोक) पॉर्न पाहिले जाते तर १९ टक्के लोक कॉम्प्युटर, लॅपटॉपवर ते पाहतात. ऑनलाइन पोर्नचे वेगवेगळे प्रकार आहेत, यात सेक्स व्हिडीओ, लाइव्ह सेक्स, लाइव्ह सेक्स चॅट, लाइव्ह वेबकॅम, सेक्स डेटिंगचा समावेश असून, भारतीय या सर्व प्रकारांत मुशाफिरी करतात. मात्र, यात सर्वाधिक प्रमाण सेक्स व्हिडीओ पाहण्याचे आहे.भारतालाच नाही, तर जगभरातील अनेक देशांना पोर्नने विळखा घातला असून, मोबाईलधारकांच्या वाढत्या संख्येसह पोर्न पाहण्याचे लोणदेखील वाढत चालले आहे.
वर्ल्ड मॅट्रिक्स रिपोर्ट-२०२४ नुसार जगात दर पाच मोबाईलपैकी एका मोबाईलमधून पोर्न सर्चिग केले जाते. ३४ टक्के लोकांना पॉप-अपच्या माध्यमातून अश्लील सामग्री प्राप्त होते.
- इंटरनेटवर हस्तांतरित
होणाऱ्या डेटात ३० टक्के वाटा हा पोर्न सामग्रीशी संबंधित आहे.जगात १३ ते २४ वयोगटाचे जवळपास ६४ टक्क्यांहून जास्त तरुण आठवड्यात एकदा तरी पोर्न कंटेंट सर्च करतात. इंटरनेटवर डाऊनलोड होणारे व्हिडीओ आणि मजकुरात ३५ टक्के वाटा हा पोर्नोग्राफिक व्हिडीओचा आहे.
भारतात पोर्न तयार करायला बंदी आहे. मात्र, पोर्न बघायला बंदी नाही. देशातील पोर्नचे वाढते लोण नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मार्च २०२४ मध्ये अश्लील व्हिडीओ, कंटेंट देणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मला ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. तसेच १९ वेबसाइट्स, १० अॅप्स आणि संबंधित ५७ सोशल मीडिया हॅण्डल बंद केले. मात्र, आजही देशात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म,वेबसाइटवर अश्लील सामग्री उपलब्ध आहे.
१० टक्के अमेरिकन्सना व्यसन
- अमेरिकेत पोर्न पाहण्याचे व्यसन असणाऱ्या तरुणांची संख्या दहा टक्के आहे. ४२.७ टक्के इंटरनेट वापरकर्ते कधीतरी पोर्न पाहतात. दहापैकी ९ अमेरिकन मुले १८ वर्षांच्या आतच कधीतरी पोर्नच्या संपर्कात आलेले असतात. अमेरिकेत ११ वर्षांपर्यंतची मुले पोर्न कंटेंटच्या संपर्कात येत आहेत.
३० टक्के डेटा पोर्न पाहण्यासाठी
- जागतिक पोर्न उद्योगाचे मूल्य ९७ बिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा (एक बिलियन डॉलर भारतीय रुपयांमध्ये ८ हजार ३०० कोटी रुपये होतात) अधिक झाले आहे. एकूण इंटरनेट डेटापैकी सरासरी ३० टक्के डेटा हा पोर्न व्हिडीओ, कंटेंट बघणे, डाऊनलोड करण्यासाठी वापरला जातो. जवळपास ६४ टक्के तरुण आठवड्यातून एकदा तरी पोर्नोग्राफिक कंटेंट सर्च करतात.
तुमची मुले-मुली स्मार्टफोनमध्ये काय बघतात, किती वेळ कोणता गेम खेळतात, कोणत्या वेबसाइट, अॅपचा वापर करतात, यावर पालकांना सहज नियंत्रण ठेवता येते. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल असते. म्हणजेच गुगलची एक फॅमिली सेटिंग, ज्या माध्यमातून पालकांना आपल्या फोनशी मुलांचा फोन लिंक करता येऊ शकतो. जेणेकरून मुले काय बघताहेत, काय सर्च करताहेत याची माहिती पालकांना सातत्याने मिळू शकते. विशिष्ट प्रकारचा मजकूर रिस्ट्रिक्टही (अडवता) करता येऊ शकतो. विशेष म्हणजे फॅमिली लिंक्सच्या आधारे मुलांचे फोन विशिष्ट वेळेला बंद करता येऊ शकतात. ज्याद्वारे कोणताही स्मार्टफोनधारक मोबाईलमध्ये कोणत्या गोष्टी वापरू शकतो, तसेच कोणत्या वापरू शकत नाही ते ठरवता येते.
पॅरेंटल कंट्रोल असे करा सक्रिय
तुम्ही गुगल प्ले स्टोअर उघडून त्यातील उजव्या बाजूला असणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. त्यामध्ये सेटिंग्जमधील ‘फॅमिली’ पर्याय निवडून त्यातील ‘पॅरेंटल पर्याय’ निवडा. त्यामध्ये पीन सेट करा. पीन सेट झाल्यानंतर अॅप, गेम, फिल्म बुक असे पर्याय येतील. यामध्ये तुम्हाला जे बंद ठेवायचे आहे, त्याचे पर्याय निवडता येतात.