– महेश खराडे
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत पहिली उचल 3700 रुपयेची मागणी केली आहे राजारामबापू कारखान्याने 3200 रुपये जाहीर करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.तीही अपुरी असून राजारामबापू सह सर्वच कारखान्यानी मागणीनुसार पहिली उचल जाहीर करावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
खराडे म्हणाले,सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा 10.50 आहे तरीही त्यांनी पहिली उचल 3500 रुपये जाहीर केली आहे.सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याचा साखर उतारा बाराच्या पुढे आहे.त्यामुळे 3700 रुपये जाहीर करायला काहीच हरकत नाही मात्र ती भूमिका घ्यायला जिल्ह्यातील साखर कारखानदार तयार नाहीत.गेल्या वर्षीही जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी योग्य दर दिला नाही.
गेली वर्षभर साखरेचा दर ही चांगला राहिला मात्र अनेक कारखान्यानी पहिल्या उचलीनंतर शेवटचा हप्ता दिलेला नाही.साखरेची आधारभूत किंमत सद्या 31 रुपये आहे ती वाढविण्यासाठी साखर कारखानदारांनी लढण्याची भूमिका घ्यावी, त्या लढाईत आम्ही ही खांद्याला खांदा लावून लढायला आम्हीही तयार आहोत.साखरेची आधारभूत किंमत 31 रुपये वरून 35 रुपये झाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.मात्र साखर कारखानदार या प्रश्नावर संघर्ष करायला तयार नाहीत हे वास्तव आहे.
जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा त्यांनी प्रयत्न करून या प्रशनी साखर कारखानदार, शेतकरी संघटना याची संयुक्त बैठक घ्यावी आणि तोडगा काढावा किंवा कारखानदारांनी आपापली पहिली उचल जाहीर करून कोंडी फोडावी,असे आवाहन जिल्ह्यातील कारखानदारांना करत आहोत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आमचे आवाहन आहे.घरात बसून दराची कोंडी फुटणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागेल संघटनेवर जबाबदारी ढकलून चालणार नाही तर तुमच्या ही सक्रिय सहभागाची गरज आहे त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शेतकरी म्हणून लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले.