जत तालुक्यातील ‌’या’ सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून किती शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीजपुरवठा वाचा सविस्तर

0
296

सांगली : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता.जत) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. 

कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ८८ प्रकल्प प्रस्तावित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट)  सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.

सौर प्रकल्प ग्राहक हिताचे – स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण

        वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे.

बसरगी (ता.जत,  जि. सांगली ) येथील सौर प्रकल्पाचे फोटो 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here