जत : पतसंस्थेच्या वसुलीसाठी आलेल्या व्यवस्थापकाची दुचाकी अडवून डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूचा धाक दाखवत एक लाख १५ हजारांची रोकड पळविणाऱ्या पाच संशयितांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक केली. ४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.पोलिसांनी सुनील तानाजी लोखंडे, सचिन महादेव बिराजदार-पाटील, परशुराम कांतु कांबळे (सर्व लवंगा, ता. जत), हंजाप्पा मांग (गिरगाव, ता.जत) यांना अटक केली असून सचिन परशुराम कांबळे (वय २४, लवंगा, ता. जत) हा पसार झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेच्या वसुलीसाठी फिर्यादी श्रीधर सुब्बराय बगली व व्यवस्थापक पालकशी मनोहर व्यंकटची हे गिरगाव येथे आले.होते. त्यांनी दिवसभरात कर्जदाराकडून कर्जाच्या हप्त्याची वसूल केलेले एक लाख १५ हजार रुपये बॅगेत घेऊन दोन दुचाकीवरून चडचणकडे निघाले होते.
दरम्यान, वरील संशयितांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूचा धाक दाखवून कर्जदाराचे हप्ते वसूल केलेल्या पैशांची बॅग घेऊन पसार झाले होते. त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक पालकशी मनोहर व्यंकटची, सहकारी श्रीधर बगली उमदी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार व सहकाऱ्यांचे पथक तयार केले.
या पथकाने हवालदार नागेश खरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कोंतेवबोबलाद येथे सापळा रचून विजयपूरला जाणाऱ्या रस्त्याकडेला चौकात वरील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.