'माझ्या मुलाला घटस्फोट दे', म्हणून सुनेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तासगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित विवाहितेचा पती आकाश सावंत व सासू मालू सावंत यांच्याविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातीला तासगाव पोलिसांनी याप्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला होता. मात्र पीडित विवाहितेने डॉ. विजय सावंत व तासगाव पोलिसांविरोधात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार केली होती. घुगे यांच्या दणक्यानंतर आज पोलिसांनी डॉ. सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी : तासगावचे माजी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांचा मुलगा आकाश याचा विवाह जयसिंगपूर येथील एका मुलीशी झाला. सुरुवातीचे सहा महिने दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी मिळून हे वाद मिटवले. मात्र थोड्या दिवसानंतर पुन्हा वाद सुरू झाले.
त्यामुळे डॉ. विजय सावंत व त्यांच्या कुटुंबीयांकडून पीडित विवाहितेकडे घटस्फोट देण्याची मागणी होऊ लागली. मात्र पीडितेने मी घटस्फोट देणार नाही. आपण घरी बसून वाद मिटवू, असे सांगितले. मात्र सावंत कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी वकिलाकडे जाऊन घटस्फोटाची कागदपत्रे तयार करू. तू घटस्फोट दे, असा तगादा विवाहितेच्या पाठीमागे लावला.
मात्र विवाहिता घटस्फोट देण्यास अजिबात तयार नव्हती. एकेदिवशी विवाहिता तिच्या बेडरूममध्ये बसली होती. त्यावेळी डॉ. विजय सावंत तिच्या रूममध्ये गेले. आपण वकिलाकडे जाऊ. घटस्फोटाची कागदपत्रे तयार करू, असे तिला सांगू लागले. मात्र तिने घटस्फोट द्यायला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विजय सावंत यांनी विवाहितेच्या दंडाला धरून ओढून बाहेर आणले. यावेळी तिला सासू मालू, पती आकाश यांच्याकडूनही मारहाण झाली. तिचा मोबाईलही फोडण्यात आला.
याप्रकरणी पीडीतेने तासगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली. विजय सावंत हे तासगावचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे पोलिसांनी विवाहितेची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे या विवाहितेने डॉ. सावंत व पोलिसांविरोधात सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार केली.
त्यानंतर घुगे यांनी याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या दणक्यानंतर तासगाव पोलिसांनी याप्रकरणी डॉ. विजय सावंत, त्यांचा मुलगा आकाश सावंत, पत्नी मालू सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. विजय सावंत हे तासगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर चक्क सुनेनेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दुसऱ्या मजल्यावरून विवाहितेचे कपडे फेकून दिले..!
संबंधित विवाहिता आकाश सावंत यास घटस्फोट देण्यास तयार नव्हती. सावंत कुटुंबीय मात्र तिने घटस्फोट द्यावा, यासाठी तिच्यावर वारंवार दबाव आणत होते. मात्र पीडित विवाहिता घटस्फोट देण्यास नकार देत होती. त्यामुळे या विवाहितेला घरातून हाकलून देण्यात आले. डॉ. विजय सावंत हे विटा रोडला पाण्याच्या टाकीजवळ दुसऱ्या मजल्यावर राहतात. या दुसऱ्या मजल्यावरून पीडित विवाहितेचे कपडे फेकून देण्यात आले. अगदी अंतर्वस्त्रेही दुसऱ्या मजल्यावरून भिरकावून देण्यात आल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.