जत यात्रेत तुकाराम बाबाचा सलग चौदा ‌वर्षे सामाजिक बांधिलकी

0
208

जत : दुष्काळ, कोरोना, महापूर असो की यात्रा, जत्रा त्या ठिकाणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज हे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालविणारे हभप तुकाराम बाबा महाराज हे मागील १३ वर्षांपासून जतच्या प्रसिद्ध श्री यलम्मा देवीच्या यात्रा काळात खास मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. 

यंदा १४ व्या वर्षीही तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे. यंदा या कार्याचा शुभारंभ तुकाराम बाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमंत शार्दूलराजे डफळे, श्रीमंत विजयसिंहराजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी, ऋषिकेश दोडकर, सतीश काराजनगी आदी उपस्थित होते.

◆ दुष्काळातही दिली साथ- श्रीमंत डफळे

निरपेक्ष भावनेने सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा यांनी कोरोना काळात केलेले कार्य हे कधीही न विसरण्यासारखे आहे. कोरोना निघून गेल्यानंतर झालेल्या गुडडापूर व जतच्या यात्रेतील हजारो भाविकांनी त्यांनी मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप केले होते. जतच्या श्री यलम्मा यात्रेतही ते मागील १४ वर्षांपासून मुक्या जिवाला मोफत पाणी पुरवठा करत आहेत. जतच्या यात्रेवर ज्याज्यावेळी दुष्काळाची गडद छाया पसरलेली असते त्या त्या त्यावेळी तुकाराम बाबा हे कायम मदतीला धावून येतात. त्याच्या कार्याला सलाम असल्याची भावना जतचे श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

◆ बाजार समितीनेही मानले आभार

जतच्या श्री यलम्मा यात्रेवेळी प्रसिद्ध खिलार जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात मोठया संख्येने पशुपालक आपली जनावरे घेवून येतात. यात्रेत कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रेवेळी दरवर्षी हभप तुकाराम बाबा यांचे सहकार्य असते. सलग १४ व्या वर्षी यात्रेत ते टँकरने पाणी पुरवठा करत मुक्या जिवाची तहान भागवत असतात. यंदाही त्यांनी या उपक्रमाचे सातत्य ठेवल्याचे सांगत श्रीमंत विजयसिंहराजे डफळे बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यांनी तुकाराम बाबांचे आभार मानले.

■ पाण्यासाठी बाबांनी घातले देवीला साकडे

जतचा दुष्काळ जर कायमचा हटायचा असेल तर जतच्या मुख्य म्हैसाळ योजना व ६५ गावसांठी वरदान ठरणारी विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने होवू दे, मायथळपासून व्हसपेठ, गुडडापूर, संख तलावात म्हैसाळचे पाणी नेण्याचे काम गतीने सुरू आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण होऊ दे, जतचा दुष्काळ कायम हटू नदी असे साकडे श्री यलम्मा देवीला घातल्याचे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here