सांगली : महिला व बालकल्याण विभागाच्या अन्वये राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून आपल्या तक्रारी महिला आयोगाकडे पाठवाव्यात, अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी दिल्या.
सामाजिक न्याय भवन सांगली येथे श्रीमती नंदिनी आवडे यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय गिड्डे, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती मीनल कोळेकर, सहाय्यक संचालक श्रीमती भांबुरे, संशोधन अधिकारी मेघराज भाते उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान गोकुळ नगर, सांगली येथील संग्राम संघटनेच्या महिलांनी श्रीमती आवडे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक उपआयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.