सांगली : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत. मटक्याचे अड्डे सुरू आहेत. त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करत विजयकुमार श्रीरंग यादव (रा. जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ) यांनी सांगली पोलिसांबद्दल अपशब्द वापरले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात फोन करून हे अपशब्द वापरले आहेत. हा कॉल रेकॉर्ड ‘व्हायरल’ झाल्यानंतर यादव यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी : जायगव्हाण येथील विजयकुमार यादव यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात फोन केला. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे तसेच तासगाव तालुक्यातील सावळज वज्रचौंडे व अन्य भागात मटक्याचा अड्डा सुरू आहे. याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यावर कारवाई केली जात नाही.
शिवाय तासगाव येथील केलेली जुगारावरील कारवाई बोगस आहे. ‘एलसीबी’चे काही लोक व पोलीस हप्ते घेतात. त्यामुळे कारवाई होत नाही. सांगलीचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही याबाबतीत लक्ष घालत नाहीत, असे म्हणत पोलिसांबद्दल काही अपशब्द वापरले.
दरम्यान यादव यांनी सांगली नियंत्रण कक्षात केलेल्या फोनचे रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ केले. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी व त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी विजयकुमार यादव यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा कॉल रेकॉर्ड ‘व्हायरल’ केल्यानंतर एक पोलीस निरीक्षक व विजयकुमार यादव यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल वापरलेल्या अपशब्दावरून संबंधित पोलीस निरीक्षकाने यादव यांना जाब विचारला आहे. हा कॉल रेकॉर्डही समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ करण्यात आला आहे.
*आमदारांबद्दलही वापरले अपशब्द..!
विजयकुमार यादव यांनी सांगली नियंत्रण कक्षात केलेल्या कॉलचे रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ केले आहे. या कॉलमध्ये त्यांनी आमदारांबद्दलही अपशब्द वापरले आहेत. तोही चर्चेचा विषय बनला आहे.