सांगली : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन अंतर्गत लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात शासकीय महसूल अंतर्गत जमा करणे आवश्यक आहे. तरी सिंचन योजना सुरळीतपणे चालू ठेवण्याकामी प्रशासकीय दृष्ट्या लाभक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांनी सर्वच लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात करावी. तसेच, ज्या लाभधारकांनी कारखान्यांकडे पाणीपट्टी जमा केली आहे, त्यांची व कपात केलेली पाणीपट्टी जमा करून सहकार्य करावे, असे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी चे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी अंतर्गत टेंभू प्रकल्प, आरफळ कालवा, कृष्णा कालवा, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प या सर्व प्रकल्पाच्या सिंचन वर्ष 2023-24 मधील खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी कपात ही कारखान्यांमार्फत केली जाते. तथापि, काही लाभधारक पाणीपट्टी न भरता ते लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस घालवितात.
ही बाब सांगली येथे सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली येथे सर्व साखर कारखान्यांचे संचालक, चेअरमन यांच्या समवेत दिनांक 2 जानेवारी 2025 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये गांभिर्याने घेण्यात आली आहे. जे लाभधारक अशा प्रकारे पाणीपट्टी न भरता लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस देत असल्यास त्यांची पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊन त्यांचे 7/12 वर महसूल खात्यामार्फत बोजा नोंद चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबत बैठकीमध्ये सहमती दर्शविली आहे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.