“ही केवळ स्पर्धा नाही,तर आपल्या मातीची ओळख आहे!”

0
35

 — एकनाथ शिंदे ; श्रीनाथ बैलगाडा शर्यतीत लाखोंचा जनसागर

कवठेमहांकाळ : शिवसेना आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील बोरगाव कोड्याचे माळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीनाथ भव्य बैलगाडा शर्यती’ ला आज लाखोंच्या संख्येने शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या भव्य स्पर्धेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.

या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रकवरून मैदानात फेरफटका मारून उपस्थित शेतकरी बांधवांचे अभिवादन केले व शर्यतीच्या माध्यमातून शेतकरी आणि बैलांचे ऋण मान्य करत गोवंश संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.“बैलगाडा शर्यत हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. शेतकरी आपल्या बैलाला जिवापाड जपतो. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, आणि त्यामुळेच लोक मला ‘काऊज मॅन’ म्हणून ओळखतात,” असे सांगून एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बैलगाडा शर्यतीच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकला.

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी प्रथमच पाहत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

पूर्वीच्या सरकारने दुर्लक्षित केलेल्या या शर्यतीला शासनाच्या प्रयत्नातून न्यायालयीन बंदीनंतर पुन्हा नवसंजीवनी मिळाली, असे सांगत शिंदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. यानंतर पै. चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून बैलगाडा मालक व पैलवानांच्या समस्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

या भव्य सोहळ्यात उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सुहास बाबर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here