आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच थेट नगराध्यक्ष निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षच आमने-सामने आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांमधील थेट लढत केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही परिणाम करणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आटपाडी नगरपंचायतीत आता पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
ग्रामपंचायत काळात शिंदे सेनेचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या गटाने सरपंचपद मिळवत सत्ता टिकवली होती. मात्र सदस्यांमधील मतभेदांमुळे विकासकामांवरून वारंवार संघर्ष झाला. आता तीच लढाई नगरपंचायतीच्या राजकारणात शिरली आहे.
शहरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिंदे सेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे राजेंद्र देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, तसेच स्वाभिमानी गटाचे भारत पाटील, आनंदराव पाटील, आणि आरपीआयचे राजेंद्र खरात यांच्यातील समीकरणे नव्याने जुळताना दिसत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचा पडळकर-देशमुख गट हातमिळवणीच्या तयारीत असून, शिंदे सेनेचे तानाजी पाटील स्वतंत्र उमेदवारीवर मैदानात उतरतील, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या ‘निरीक्षकाच्या भूमिकेत’ असून, महायुतीतील नाराज कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचत तिसरा पर्याय उभा करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्याच नगराध्यक्ष निवडणुकीत पारंपरिक विरोधकांऐवजी सहकारी पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने, आटपाडीची राजकीय लढत तालुक्याच्या सीमा ओलांडून जिल्हास्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.
नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार?राष्ट्रवादीचा ‘किंगमेकर’चा डाव कोणाला लाभदायी ठरणार?या प्रश्नांची उत्तरं आगामी काही दिवसांत राजकीय वर्तुळ ठरवणार आहे.




