मोटेवाडीत यात्रेत भीषण दुर्घटना | भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू; १५ जण गंभीर

0
0

संकेत प्रतिनिधी (रियाज जमादार) : जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथे श्री मुरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान मंगळवारी सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण सीमाभाग हादरून गेला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे यात्रेसाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड उडून मंदिरालगतच्या भिंतीवर आदळले आणि सुमारे दोनशे फुटांची भिंत कोसळून सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १५ ते १७ जण गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोटेवाडी येथील श्री मुरगुबाई देवीची यात्रा ही जत तालुक्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अत्यंत प्रसिद्ध यात्रा मानली जाते. यात्रेसाठी मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक भाविक मंदिरालगतच्या मोठ्या भिंतीजवळ उभे होते. त्याचवेळी यात्रेसाठी उभारलेले पत्र्याचे शेड वाऱ्याच्या तडाख्याने उडून थेट भिंतीवर आदळले. जोरदार धक्क्यामुळे भिंत कोसळून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले.

घटना इतकी अचानक घडली की नागरिकांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. भिंत कोसळताच परिसरात एकच आरडाओरड सुरू झाली. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत मंगल भाऊसाहेब मोटे (रा. पाडोंझरी), अरुण विजय गेजगे, सोनू लक्ष्मण गेजगे (दोघे रा. डोमनाळ, कर्नाटक), संजुबाई राम चौधरी (रा. टक्कळकी, कर्नाटक), कोंडीबा साऊबा गेजगे आणि शंकर आबा लोखंडे (दोघे रा. दरीबडची) यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, वृद्ध आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दर्याप्पा नागा कोकरे, मुर्शिद पुजारी, मरीबा नागा कोकरे, संजू एवळे, शिवा गेजगे यांच्यासह अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर जत, सांगली आणि मिरज येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, नायब तहसीलदार पंडित कोळे यांच्यासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून बचावकार्य करण्यात आले.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आश्वासन दिले. दुर्घटनेनंतर मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली असून यात्रेचे उत्सवी वातावरण काही क्षणांतच दुःखात बदलले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here