श्री महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताई विजयराव सगरे यांच्यासह कवठेमहांकाळ पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा प्रवेश सोहळा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याहस्ते पार पडला.
यावेळी श्री महांकाली साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंतनु सगरे, व्हा.चेअरमन दिपकराव ओलेकर, संचालक जीवनराव भोसले (माजी सभापती, समाजकल्याण जि.प.सांगली), चंदकांत लोंढे, तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन नानासो सगरे, तसेच बंडू काशिनाथ कदम, बाळासो ओलेकर, सूर्यकांत पाटील, मोहन खोत, प्रशांत शेजाळ, रमेश खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेशात सहभागी झाले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ.महादेव कुरणे, आनंदा देवमाने, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, अरविंद पाटील, सोनी नाना घोरपडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी, “आता दोन भाऊ चेअरमन अनिताई सगरे यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. यापुढे त्यांच्यावर कोणतेही आरोप सहन केले जाणार नाहीत. कारखाना सुरू होणारच,” असा इशारा दिला. तर संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांनी श्री महांकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ठाम आश्वासन दिले.
या पक्षप्रवेशामुळे कवठेमहांकाळ परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.




