महापालिकेवरील प्रशासक राजवट संपुष्टात

0
4

नवीन सभागृह अस्तित्वात; आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांसमवेत काढला स्मरणीय फोटो

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकावर १९ ऑगस्ट २०२३ पासून लागू असलेली प्रशासक राजवट अखेर संपुष्टात आली आहे. महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आल्यामुळे प्रशासक राजवट आपोआप समाप्त झाली. यानिमित्ताने आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत स्मरणीय छायाचित्र काढले.

महापालिकेवर प्रशासक म्हणून प्रथम डॉ. राजा दयानिधी, त्यानंतर शुभम गुप्ता आणि पुढे सत्यम गांधी यांनी प्रशासकासोबतच आयुक्तपदाचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळला. प्रशासक राजवटीच्या काळात प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवत नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर देण्यात आला.

नवीन सभागृह स्थापन झाल्यानंतर लवकरच पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता असून, त्यामुळे लोकप्रतिनिधींमार्फत महापालिकेचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. ही ऐतिहासिक घडी लक्षात ठेवण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रशासक राजवटीतील शेवटच्या टप्प्यात अधिकाऱ्यांसोबत छायाचित्र काढले.

हा कार्यक्रम पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृह येथे झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, मुख्य लेखा अधिकारी विद्यारत्न काकडे, पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, नकुल जकाते, विद्या घुगे, आरोग्याधिकारी डॉ. सुचेता पवार, पाणीपुरवठा विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, शहर कार्यक्रम अधिकारी (टीबी विभाग) मंजुषा दोरकर, आस्थापना अधिकारी व जनसंपर्क अधिकारी विनायक जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन सभागृहाच्या स्थापनेमुळे महापालिकेच्या कारभारात लोकशाही प्रक्रियेचा नवा अध्याय सुरू होत असून, शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here