सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने फोडून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व आटपाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत उत्तरप्रदेश व सांगली जिल्ह्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे राहुल रंजमीश शर्मा (वय २७, रा. गाव ककराला, ता. जि. बधायु, उत्तरप्रदेश), विश्वजीत विजय पाटील (वय २४, रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली), संकेत अरुण जाधव (वय २६, रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली) आणि इजाज राजु आत्तार (वय ३०, रा. आमनापूर, ता. पलूस, जि. सांगली) अशी आहेत.
दि. ७ जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस व एलसीबीला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
तपासादरम्यान घटनास्थळी वापरण्यात आलेल्या गॅस कटरचा सखोल मागोवा घेतला असता तो पलूस येथून आणल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीनुसार विश्वजीत पाटील, संकेत जाधव आणि इजाज आत्तार यांची नावे पुढे आली. चौकशीतून विश्वजीत पाटील हा पूर्वी उत्तरप्रदेशात गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच राहुल शर्मा व त्याच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतल्याचे उघड झाले. तसेच उत्तरप्रदेशातील काही संशयित पलूस येथील लॉजवर वास्तव्यास असल्याची माहितीही तपासात समोर आली.
यानंतर एलसीबीचे सहायक निरीक्षक पंकज पवार व जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके उत्तरप्रदेशात पाठवण्यात आली. पथकाने राहुल शर्मा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केले. त्याचे इतर साथीदार सध्या पसार असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या चारही आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक गॅस सिलिंडर तसेच स्कॉर्पिओ (क्र. DL 10 CF 9268) असा एकूण ३.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या उल्लेखनीय कारवाईबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी एलसीबीच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
ही कारवाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक पंकज पवार, जयदीप कळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमिरशा फकीर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरच, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सुरज थोरात, केरुबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, शिवाजी सिद, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने संयुक्तपणे यशस्वी केली आहे.
झरे ता.आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर फोडून चोरीप्रकरणातील पकडलेले संशयितासह मुद्देमाल व पोलिस पथक




