जत,संकेत टाइम्स ; कृषी दुकानात खते उपलब्ध नसल्याचे सांगून कंपनीने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना सद्यस्थितीत त्यांच्या दुकानात खतांचा किती साठा (स्टाॅक) आहे, याची माहिती समजण्यासाठी दुकानाच्या पुढेच उपलब्ध साठा दर्शविणारा फलक लावण्याची सक्ती करावी, अशी
मागणी कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे,बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी केली आहे.
तालुक्यात खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना खते-बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र कृषी सेवा केंद्र चालक जाणीवपूर्वक तुटवडा असल्याचे कारण सांगून शासनाने ठरवून दिलेल्या (एमआरपी) किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खत विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने चढ्या दराने खते-बियाणे खरेदी करावे लागत आहेत. अशा रीतीने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी कृषी दुकानदारांकडे असलेला खते-बियाणांचा उपलब्ध साठा फलक दुकानाबाहेर लावण्याचे आदेश द्यावेत.
ज्यामुळे खतांचा तुटवडा भासवून जादा दराने होणाऱ्या विक्रीवर नियंत्रण ठेवता येईल.जतच्या कृषी विभागाकडून कोरोनात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी,यासाठी कृषी दुकानदारांकडून हंगामी हप्ते वसूली न करता दरवाढ करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत,अशी मागणी होत आहे.