ढालगावचे अजितराव खराडे यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन’ पुरस्कार

0
1

ढालगाव  : ढालगावचे सुपुत्र, स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सैनिक अजितराव खराडे यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन-२०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा २ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडला.महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार अजितराव खराडे यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्याचा उद्देश या पुरस्कार सोहळ्यामागे होता.

माजी सैनिक असलेले अजितराव खराडे यांनी सेवानिवृत्तीनंतर उद्योगविश्वात प्रवेश करत स्वराज्य उद्योग समूहाची स्थापना केली. शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रभक्ती ही सैन्यातील मूल्ये त्यांनी उद्योगक्षेत्रातही जोपासली. स्वराज्य उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसायिक यश मिळवले नाही, तर सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.

ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, सहकार क्षेत्रात पारदर्शकता व शिस्त निर्माण करणे यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन-२०२५’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना अजितराव खराडे यांनी हा सन्मान स्वराज्य उद्योग समूहातील सर्व सहकारी, कर्मचारी तसेच आपल्या कुटुंबीयांना समर्पित असल्याचे सांगितले. समाजासाठी आणि राज्याच्या विकासासाठी उद्योगाच्या माध्यमातून काम करत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या पुरस्कारामुळे ढालगाव परिसरासह सांगली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, विविध क्षेत्रांतून अजितराव खराडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे तरुणांना उद्योग व समाजसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ढालगावचे माजी सैनिक अजितराव खराडे दापत्यांला ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन’ पुरस्कार देताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व मान्यवर

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here