सांगलीत अमानुष शिक्षेमुळे चिमुकलीचा मृत्यू; ३६ तास उलटे टांगल्याने जीव गेला

0
0


सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, बापाच्या अमानुष शिक्षेमुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून दोन लहान मुलींना तब्बल ३६ तास उलटे टांगून ठेवण्यात आले होते. यात एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी झाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादू उर्फ दादा हैबची यमगर असे आरोपी पित्याचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन असून तो कुटुंबीयांवर वारंवार अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या कुटुंबात पत्नी, आजी-आजोबा आणि पाच मुले असा एकूण नऊ जणांचा समावेश आहे.
घटनेतील मृत मुलगी ऋतुजा उर्फ सानिका (वय ९) असून, तिची बहीण अनुजा (वय ११) ही गंभीर जखमी आहे. शेजाऱ्यांनी या दोन्ही मुलींवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. याच कारणावरून संतापलेल्या पित्याने दारूच्या नशेत अमानुष शिक्षा देत दोघींना घरातील तुळईला उलटे टांगून ठेवले.


या अवस्थेत दोन्ही मुलींना तब्बल ३६ तास ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपी व त्याची पत्नी मुलींच्या खालीच झोपले होते, तर घरातील इतर सदस्य बाहेर होते. या काळात तहानेने व्याकुळ झालेल्या सानिकाने वारंवार पाणी मागितले, मात्र तिला पाण्याचा एक थेंबही देण्यात आला नाही.
मोठी बहीण वर्षा हिने मदतीचा प्रयत्न केला असता आरोपीने कोयत्याने धमकावत तिला व इतर भावंडांना दूर ठेवले. अखेर दीर्घकाळ उलटे टांगून ठेवणे, शारीरिक वेदना आणि पाण्याअभावी सानिकाचा मृत्यू झाला, तर अनुजा गंभीर अवस्थेत बचावली.


घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी अनुजा उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना संपूर्ण घटना सांगितली. डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीचे व्यसनाधीन व हिंसक वर्तन वारंवार समोर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कौटुंबिक हिंसाचार आणि व्यसनाधीनतेकडे समाजाने वेळीच लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शेजारी व स्थानिक नागरिकांनी संशयास्पद घटना दुर्लक्षित न करता प्रशासनाला माहिती दिल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here