सांगली : कृष्णा नदीवरील शेतीसाठीची उपसाबंदी तातडीने उठवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. उपसाबंदीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर शेती व पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
ढवळी, म्हैसाळ व बेडग परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी धनाजी जगताप तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी महादेव कदम व सचिन सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ‘उपसाबंदी तातडीने उठवा’, ‘शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा’, ‘वीज जोडणी सुरू करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
खराडे म्हणाले, कोणतीही पुरेशी पूर्वसूचना न देता उपसाबंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. ऊस लागवडीची कामे खोळंबली असून खरीप पिके पाण्याअभावी करपण्याची स्थिती आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणीपातळी व प्रवाह कायम ठेवण्यासाठी उपसा बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी शेती व पशुधनासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार नाही, याचा विचार करून तातडीने उपसाबंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
उपसाबंदी लागू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना पुरेशी पूर्वसूचना देणे, तसेच पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी कल्लाप्पा मगदूम, राकेश आलते, श्रीकृष्ण कदम, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, संजय पाटील, शांतिनाथ गुंडवडे, अजित शिरढोणे, राजू पाटील, बंडा आलते, सचिन मगदूम, सुरेश देवकारे, संजय अकिवाटे, गोपाल अकिवाटे, आकाश गौरजे, बंडू चौगुले, अनिल नाईक, सुरज मगदूम, नरसु गौराजे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळ : कृष्णा नदीवरील उपसाबंदी तातडीने उठवण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी धनाजी जगताप व पाटबंधारे अधिकारी महादेव कदम यांना देताना महेश खराडे व शेतकरी.




