श्रीपती शुगरमध्ये २०२६-२७ गळीत हंगामाची तयारी सुरू | तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

0
1

डफळापूर : श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लिमिटेड डफळापूर-कुडणूर येथे सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा शुभारंभ रविवारी (दि. १९ एप्रिल २०२६) कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील कंत्राटदारांना करारपत्रांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात काशिलिंग अंकुश घोदे, लकाप्पा भैराप्पा नरुटे, धनाजी मुरग्याप्पा हजारे, चंद्रकांत संजय निकम, भाऊसो मारुती कुल्लोळी, आप्पासो बाबासो पाटील, मायाप्पा जयगोंडा कराडे, जयसिंग शिवाजी खरात, अज्ञान दशरथ पांढरे, कार्याप्पा श्रीमंत बेवनुरे आणि म्हाळाप्पा बिरुदेव जानकर या पहिल्या अकरा ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांना अधिकृतपणे करारबद्ध करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करून आगामी हंगामासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

कार्यक्रमात बोलताना कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी सांगितले की, येणाऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याकडून सर्व आवश्यक तयारी वेगाने सुरू आहे. यंदाच्या हंगामासाठी सुमारे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी वेळेत कारखान्याच्या शेती विभागाकडे करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लाड पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कारखान्याकडून आधुनिक अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून उसाची नोंदणी, तोडणी कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन सुधारेल आणि ऊस वाहतुकीतील अडचणी कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, ऊस तोडणी व वाहतूक यासाठी सक्षम आणि सुस्थितीत यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार असून कार्यक्षेत्रातील तसेच परिसरातील वाहन मालकांनी पुढाकार घेऊन कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा आणि करार प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावर्षी विशेषतः यांत्रिक तोडणीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र सुविधा व प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस वाहतूकदार आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी कारखान्याच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत आगामी हंगाम यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

कारखान्याकडून वेळेत नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्व घटकांचा सहभाग या माध्यमातून गळीत हंगाम अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न होत असून, यामुळे शेतकऱ्यांना लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्रीपती शुगर अॅण्ड पॉवर येथे २०२६-२७ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांना कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते करारपत्रांचे वाटप करताना.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here