जत : जत तालुक्याची ओळख आणि दुष्काळी भागातील धनगर बांधवांच्या कष्टाचे प्रतीक असलेल्या माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने जत तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मान्यतेसाठी जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी २०२२ पासून केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा जत काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जात म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे २०२२ मध्ये विक्रमसिंह सावंत यांनी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या काळात या मागणीला मिळालेली साथ आणि त्यानंतरचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अखेर जतकरांना ही आनंदाची बातमी मिळाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
जत तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कमी पाऊस आणि मर्यादित शेतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक शेतकरी तसेच धनगर कुटुंबांसाठी मेंढीपालन हा उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. माडग्याळ मेंढीची स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, तिची वैशिष्ट्ये आणि पशुपालकांमधील असलेली लोकप्रियता यामुळे या जातीला विशेष महत्त्व आहे.
राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ मेंढीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, संगोपन आणि प्रजनन करण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्वतंत्र जात म्हणून ओळख निर्माण झाल्याने संशोधन, सुधारित प्रजनन कार्यक्रम आणि पशुपालकांसाठी विविध शासकीय योजनांचा मार्गही अधिक सुकर होऊ शकतो. त्यामुळे मेंढीपालन व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
धनगर बांधवांच्या कष्टाची मानाची पावती : विक्रमसिंह सावंत
“माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता मिळणे ही केवळ माझ्या मागणीची पूर्तता नसून जत तालुक्यातील हजारो धनगर बांधवांच्या कष्टाला मिळालेली मानाची पावती आहे,” अशी प्रतिक्रिया माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
माडग्याळ मेंढीच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, आधुनिक प्रजनन केंद्रे सुरू करावीत, पशुपालकांना आर्थिक मदत द्यावी तसेच आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली. राष्ट्रीय मान्यतेचा प्रत्यक्ष फायदा स्थानिक पशुपालकांना मिळण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माडग्याळ मेंढीला मिळालेली राष्ट्रीय ओळख ही जतच्या पशुपालकांसाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची घटना ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




