सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील ४२ वर्षीय विवाहित महिलेची सोलापूर जिल्ह्यातील तरटगाव येथील २७ वर्षीय अरविंद बाळू मस्के याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातून महिलेचा पती, मुलगा आणि अन्य व्यक्तींनी अरविंदला बेदम मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. गंभीर जखमी झालेल्या अरविंदचा २२ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद आणि संबंधित विवाहित महिला गेल्या काही महिन्यांपासून फोनवरून संपर्कात होते. एप्रिलमध्ये महिला अरविंदच्या घरी आली होती. त्यानंतर ती पुन्हा त्याच्याकडे आली आणि लग्न करण्याचा आग्रह धरू लागली. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा अरविंदकडे आल्यानंतर सासरी परत गेली नसल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, महिलेचा पती तिला घेण्यासाठी आला असता तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यानंतर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. काही दिवसांनी महिला पुन्हा पतीच्या घरी गेली.१३ ऑगस्ट रोजी अरविंद घरी आला असता, संबंधित महिलेने भेटण्यासाठी बोलावल्याचे त्याने आईला सांगितले. १५ ऑगस्ट रोजी तो महिलेला भेटण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी महिलेचा पती, मुलगा आणि अन्य साथीदारांनी त्याला अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीत अरविंद गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला तामलवाडी पोलिस ठाण्यात नेले. प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच २२ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी अरविंदच्या आईने तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत.
प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या मारहाणीने एका तरुणाचा जीव गेल्याने सोलापूर जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरू झाली असून, पोलिस तपासातून या प्रकरणातील नेमकी कारणे आणि इतर आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.




