उद्योजकाला भरदिवसा लुटणाऱ्या टोळीतील एकाला अटक; न्यायालयाकडून ५ दिवसांची पोलिस कोठडी

0
2

:


वैजापूर : समृद्धी महामार्गावर वैजापूर आणि सिन्नर परिसरात अवघ्या २४ तासांत लुटमारीच्या दोन घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात राहुरी येथील उद्योजकाला भरदिवसा लुटणाऱ्या टोळीतील किरण आजिनाथ गायकवाड (२५) याला वैजापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

२६ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास उद्योजक साहिल सोनवणे हे समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना पिंपळगाव टोलनाक्याजवळ ८ ते १० दरोडेखोरांनी त्यांच्या कारला तिन्ही बाजूंनी घेरले. वाहन थांबताच आरोपींनी सोनवणे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. इतर आरोपींनी कारच्या काचा फोडून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कारमध्ये डॅश कॅमेरा असल्याचे सोनवणे यांनी सांगताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी किरण गायकवाड याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुटखा तस्करांशी संबंध असल्याचा संशय

अटकेत असलेल्या गायकवाडवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याची ८ ते ९ जणांची टोळी समृद्धी महामार्गावर सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीचे बीड जिल्ह्यातील गुटखा तस्करांशी संबंध असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे लुटमारीमागे केवळ स्थानिक गुन्हेगारी टोळी आहे की त्यामागे मोठे तस्करीचे नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लुटलेली सोनसाखळी आणि वाहनांचा शोध

पोलिसांनी या दरोड्यातील सर्व आरोपी निष्पन्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप केवळ गायकवाड पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या चौकशीत अन्य आरोपींची नावे, लुटलेली सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दरोड्यात वापरण्यात आलेली तीन वाहने कोणाच्या मालकीची आहेत, तसेच त्यांना बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती का, याचाही तपास केला जात आहे.

तपासाच्या श्रेयावरून यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव?

दरम्यान, वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये तपासाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ असल्याची चर्चा आहे. दोन्ही यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे तपासात अडथळे येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

उपअधीक्षक भागवत फुंदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here