जुन्या आर्थिक फसवणुकींच्या घटनांनंतरही नव्या योजनांचे पेव; कायदेशीर तपासणीशिवाय पैसे न गुंतवण्याचे आवाहन
जत : जत तालुक्यात गुंतवणूक, मार्केटिंग आणि आकर्षक परताव्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. सुमन गारमेंटची परकर योजना, साडी योजना, संचयनी, कल्पतरू, पर्ल्स ग्रीन, अॅग्री गोल्ड, समृद्ध जीवन, मैत्रेय यांसह विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आल्याच्या घटना चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे ‘जतकर भोळे की, गंडविणाऱ्यांची चलाखी?’ असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.
आकर्षक परतावा, मोठे कमिशन, एजंट होण्याची संधी आणि अल्पावधीत आर्थिक प्रगतीचे स्वप्न दाखवून अनेक योजनांचे मार्केटिंग करण्यात आले. सुरुवातीला विश्वास निर्माण करण्यासाठी बैठका, कार्यक्रम, पार्ट्या तसेच एजंटांच्या बदललेल्या जीवनशैलीचे उदाहरण दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, केवळ एजंट महागड्या वाहनातून फिरतो किंवा कंपनीकडून परदेश दौरे आयोजित केले जातात म्हणून एखादी योजना सुरक्षित ठरत नाही.
काही योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानंतर अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. दुसरीकडे काही मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याची चर्चा झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकले, मात्र काही एजंटांची आर्थिक स्थिती सुधारली, अशी विसंगत परिस्थिती काही प्रकरणांत दिसून आली.
विशेष म्हणजे, केवळ गुंतवणूकदारच नव्हे तर काही वेळा मार्केटिंग करणारे एजंटही संबंधित योजनांमध्ये अडकल्याचे प्रकार घडले आहेत. जुन्या अनुभवांतून धडा घेण्याची गरज असतानाही नव्या वस्तू, नेटवर्क मार्केटिंग आणि विविध कमिशन आधारित योजनांचे आकर्षण नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
नवीन कोणतीही योजना स्वीकारण्यापूर्वी कंपनीची कायदेशीर नोंदणी, संबंधित नियामक संस्थेची मान्यता, गुंतवणुकीवरील परताव्याच्या अटी, करारातील तरतुदी आणि पैशांचा व्यवहार यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. केवळ परिचित व्यक्ती, एजंट किंवा नातेवाईकाने योजना सुचवली म्हणून पैसे गुंतवणे धोकादायक ठरू शकते.
विशेषतः उत्पादन किंवा सेवेपेक्षा सदस्यसंख्या वाढविणे, कमिशन आणि नेटवर्क विस्तार यावरच अधिक भर असल्यास नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ‘लवकर श्रीमंत होण्याचे’ आमिष जितके मोठे, तितकी जोखीमही मोठी असू शकते, हे पूर्वीच्या घटनांनी स्पष्ट केले आहे.
जत तालुक्यात वारंवार घडलेल्या आर्थिक फसवणुकींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रांची आणि योजनेची अधिकृत माहिती तपासावी. संशयास्पद वाटणाऱ्या योजनांपासून दूर राहून आवश्यक असल्यास संबंधित शासकीय किंवा नियामक यंत्रणेकडून माहिती घ्यावी. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणांसोबतच नागरिकांची जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे.




