सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले.
सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात सहकाराची उभारणी केली; मात्र सहकारात पक्षीय राजकारण केले नाही. त्यामुळे बँकेकडे पक्षीय भावनेतून पाहू नये, असे पाटील म्हणाले.
जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून पिकांची स्थिती गंभीर बनली आहे. कोयना व वारणा धरणांत पाणीसाठा असताना पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे उपसाबंदी मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. भात, सोयाबीन यांसह पिके करपण्याची स्थिती असून कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी गरजू पिकांसाठी वापरण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मळीमिश्रित पाण्याची चौकशी करा : कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलून मळीमिश्रित पाणी आल्याची तक्रार आहे. कोणत्या कारखान्यातून हे पाणी सोडले जाते, याची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.




