भरधाव कंटेनरची तीन मोटारसायकलींना मागून धडक; चालक वाहन सोडून पसार
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे गुरुवारी भरधाव कंटेनरने पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अब्दुललाट येथील भाऊसो जयपाल गिरमल (५०), अश्विनी भाऊसो गिरमल (४५), अर्जुनवाड येथील शकील मुल्ला आणि तेरवाड येथील मंगल पाटील यांचा समावेश आहे.
हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगाने जात होता. तेरवाड येथील रसवंती गृहाजवळ कंटेनरने पुढे जाणाऱ्या तीन मोटारसायकलींना पाठीमागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, मोटारसायकलीवरील काही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मंगल पाटील यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अपघातानंतर कंटेनर रस्त्यालगतच्या लोखंडी कठड्याला धडकून शेतात जाऊन थांबला. मात्र, चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील राजमाने यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर पोलीस ठाण्याजवळ आणण्यात आला. अपघाताचे नेमके कारण तसेच चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या भीषण अपघातामुळे तेरवाडसह शिरोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तेरवाड येथे अपघातानंतर शेतात घुसलेला कंटेनर.




