सांगली, दि. ८ : नवरात्रोत्सव व आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बालाजी चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या कारवाईत दुकानांबाहेर उभारलेल्या ६ अतिक्रमित शेड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
बालाजी चौक, जुनी भाजी मंडईकडे जाणारा रस्ता, दत्त मारुती रोड आणि गणपती पेठ मेन रोड परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी पाहणी केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांना दुकानाबाहेरील अतिक्रमित जागा व साहित्य हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चप्पल विक्रेत्यांच्या शेडसह फळ विक्रेत्यांचे रस्त्यालगतचे साहित्य, स्टँड बोर्ड व इतर अडथळे हटविण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शेड व साहित्य हटविण्यास सुरुवात केली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने रस्ते व पादचारी मार्ग मोकळे ठेवण्याचे आवाहन महापालिकेने व्यापाऱ्यांना केले आहे.
बालाजी चौक परिसरात अतिक्रमित शेड हटवून रस्ता मोकळा करताना महापालिकेचे अतिक्रमण पथक.




