मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदत, राज्यभर विशेष शिबिरे

0
1

मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत पात्र नागरिकांना मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंत संधी देण्यात आली आहे. यासाठी शनिवार आणि रविवारी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवमतदारांसह प्रारूप मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात ही मोहीम सुरू आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीतून यापूर्वीच्या यादीतील सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांना पुन्हा नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत नाव नोंदणीसाठी नमुना-६ अंतर्गत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज दाखल झाले आहेत. मतदारयादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी नमुना-८ अंतर्गत ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर नावे वगळण्यासाठी नमुना-७ अंतर्गत १८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा

१ ऑक्टोबर या अर्हता दिनांकापर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना तसेच अन्य पात्र नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदविता येईल. हे अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करता येतील. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

प्रारूप मतदारयादीत नाव असूनही नोटीस मिळालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध कागदपत्रे सादर करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून मतदारयादीतील आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here