जत, ता. २१ : डफळापूर (ता.जत) येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड कारखान्यातील लेखा विभागातून एक लाख ७४ हजार १५० रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना शनिवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली. चोरट्याने कार्यालयाच्या दरवाजाचे तसेच टेबलच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून चोरी केली.
कारखान्याचे सुरक्षा अधिकारी तानाजी रामू चव्हाण यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कनिष्ठ लेखा लिपिक सोहन जाधव यांनी लेखा विभागाचे कार्यालय उघडे असून, आतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याची माहिती फोनवरून दिली.
त्यानंतर सुरक्षा अधिकारी चव्हाण यांनी पर्यवेक्षक सदाशिव कोरे, माणिक पाटील आणि आनंदा कदम यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी कार्यालयाच्या दरवाजाचे आणि ड्रॉवरचे कुलूप तोडल्याचे आढळले. ड्रॉवरमध्ये एचएनटी विभागाच्या वसुलीची एक लाख ७५ हजार १९८ रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. त्यापैकी एक लाख ७४ हजार १५० रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे कारखाना परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरीचा तपास सुरू आहे.




