..तर श्रीलक्ष्मी आपल्या घरीही निरंतर वास करेल !

0
0

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांची कार्यालये, कारखाने, दुकाने यांसह प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन केले जाते.  श्रीलक्ष्मीचा वास आपल्या घरी सदैव राहावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र लक्ष्मी कोणाच्या घरी वास्तव्य करते ? कार्तिक अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते असा शास्त्रसंकेत आहे. रात्री संचार करून ती आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

त्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरी असावा असे वाटणाऱ्यांनी आपल्यामध्ये उपरोक्त गुण आणण्यासाठी आणि आपली वर्तणूक सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. सद्यस्थितीला समाजातील नैतिकता रसातळाला गेली आहे. स्वार्थांधता वाढली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. गल्लीतल्या भाजीवाल्यापासून दिल्लीतल्या मंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण इतरांना फसवून आपला स्वार्थ साधत आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपले राहणीमान सुधारले असले तरी नीतिमत्ता कमालीची घसरली आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. असे असले तरी आजमितीला जसा चरित्र्यवान आणि सत्वशील माणसांच्या घरी लक्ष्मीचा वास दिसतो तसा इतरांना लुबाडून किंवा गैर मार्गाने धन कमावून श्रीमंत झालेल्यांच्या घरीही लक्ष्मीचे अर्थात धन संपत्तीचे वास्तव्य दिसते. हा दुजाभाव कसा? याचे उत्तर अध्यात्मात सापडते.

अध्यात्मानुसार आपण कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे आपल्या मागील जन्माच्या कर्मावरून ठरते. ज्या मुहूर्तावर एखाद्या धनदांडग्या उद्योगपतीच्या घरी मूल जन्माला येते त्याच मुहूर्तावर एखाद्या झोपडीतही बाळ जन्म घेते. जन्मवेळ आणि जन्मदिनांक सारखी असली तरी दोघांचे मागच्या जन्मीचे कर्म वेगवेगळे असल्याने दोघांचे प्रारब्ध भिन्न असते. त्यामुळे त्यांच्या नशिबी येणारे सुख दुःखही निरनिराळे असणार आहेत. पुढील आयुष्यातही दोघांच्या नशिबी येणारे चांगले वाईट भोग हे वेगवेगळेच असतील. या जन्मात दुष्कृत्य करूनही जर एखाद्याला संपत्ती प्राप्त होत असेल तर ते त्याचे मागच्या जन्मीचे पुण्यसंचय असून दुष्कर्माने ते तो संपवत आहे.

प्रत्येकाच्या नशिबी जसे प्रारब्ध असते तसे त्याच्या हाती क्रियमाणही असते. क्रियमाणाचा  योग्य वापर केल्यास मनुष्य या जन्मातही हवे ते प्राप्त करू शकतो. क्रियमाणाचा वापर आपले सत्वशील चारित्र्य घडवण्यासाठी केल्यास, भगवंताने मनुष्यजन्म देऊन दिलेल्या कर्तव्यांचे धर्म आणि नीती यांचा वापर करून योग्यरीत्या पालन केल्यास. कठीण प्रसंगांत दोषांवर नियंत्रण ठेवून संयम दाखवल्यास, इतरांचा विचार प्राधान्याने करून धर्माने वागल्यास आणि अंगी क्षमाशील वृत्ती जोपासल्यास आपल्याही कर्मांना भगवंत नक्कीच चांगले फळ देईल आणि आपल्याही घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील. अर्थात लक्ष्मी म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे तर सुख, समाधान आणि शांती ही सुद्धा लक्ष्मीचीच रूपे आहेत. जीवनात आपली कर्मे चांगली असतील तर लक्ष्मी कोणत्याना कोणत्या रूपाने आपल्या घरी नक्कीच वास करते. यंदाच्या लक्ष्मीपूजनाला आपल्याला चारित्र्यवान, धर्मनिष्ठ आणि क्षमाशील बनवण्यासाठी देवीच्याच चरणी प्रार्थना करूया !

– सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई  

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here