हभप तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन; काळी दिवाळी साजरी करत प्रशासनाचा निषेध
जत : म्हैसाळ योजनेचे पाणी अंकलगी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी यंदा अनोख्या पद्धतीने काळी दिवाळी साजरी केली. कोरड्या तलावात १,००१ दिवे लावून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
जत तालुक्यातील गुड्डापूर, व्हसपेट, संख आणि अंकलगी या गावांतील तलावांमध्ये म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच सहा महिन्यांत काम पूर्ण करून अंकलगी तलावात पाणी सोडण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाकडून अनेकदा देण्यात आले. मात्र, अद्याप तलावात पाणी पोहोचले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिवाळीच्या काळात सर्वत्र दिव्यांची रोषणाई होत असताना अंकलगीच्या कोरड्या तलावात दिवे लावून ग्रामस्थांनी आपल्या पाणीटंचाईच्या वेदना व्यक्त केल्या.
यावेळी तुकाराम बाबा महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी तलावात ठिय्या आंदोलन केले. मायथळ ते अंकलगीदरम्यानची कामे गतीने पूर्ण करून तलावात तातडीने म्हैसाळचे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली.
लवकरच बेमुदत उपोषणाचा इशारा
यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मायथळ ते अंकलगीदरम्यान पाणी पोहोचविण्यासाठी आपला लढा सुरू आहे. संथ कामामुळे तलावात अद्याप पाणी आलेले नाही. यापूर्वी अनेक आंदोलने करूनही प्रश्न सुटलेला नाही. आता शासनाने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अन्यथा अंकलगी तलावातच बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल.
या आंदोलनात संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती, पुणे फ्रेंड्स मंडळ, वाल्मिकी युवक मंडळ, मॉर्निंग स्टार क्रिकेट मंडळ, शेतकरी संघटनेचे सिद्धाराम गुरव, मानव अधिकार संघटनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.



