भरधाव कारच्या धडकेत दोन मामेभावांचा मृत्यू |भिषण अपघात ; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

0
0

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मामेभावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी विद्यापीठाजवळ घडली. या प्रकरणी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटील (वय ३६) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

या अपघातात गणेश सुनील पाथरूट (वय ३४) आणि उमेश विलास पाथरूट (वय ३२, रा. सायबर चौक, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. दोघेही रविवारी रात्री जेवणानंतर शाहू टोल नाका परिसरात पान घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी महामार्गावरील हॉटेलमधून घरी परतणाऱ्या पद्मसिंह पाटील याच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेला. त्याने घरी जाऊन नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटील कुटुंबीय अपघातस्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी मद्यधुंद चालकाला तातडीने अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी पद्मसिंह पाटील याला अटक केल्यानंतर तणाव निवळला.

दोन कुटुंबांचा आधार हरपला

गणेश आणि उमेश हे दोघेही दगडावर नक्षीकाम करून तसेच देवदेवतांच्या मूर्ती घडवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गणेशच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई-वडील आहेत. तर उमेशची पत्नी गर्भवती असून त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. दोघेही कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेनंतर सायबर चौक परिसरात शोककळा पसरली. संतप्त नागरिकांनी अपघातास जबाबदार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली.

या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

कोल्हापूर : अपघातग्रस्त वाहने,तर संशयित पद्मसिंह पाटील याला पोलीसांनी ‌ताब्यात घेत,कारवाई केली. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here