पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणांची मागणी |सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

0
1

नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांतर आणि आमदार-खासदारांच्या राजीनाम्यांमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ए. सेथू यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

राजीनाम्याच्या माध्यमातून कायद्याला बगल?

पक्षांतर केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर काही लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींच्या निर्णयापूर्वीच राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवतात. या प्रक्रियेमुळे पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ उद्देश निष्प्रभ ठरत असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांनी अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना दिलेल्या राजीनाम्यामुळे ती प्रक्रिया आपोआप संपुष्टात येऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच राजीनामा स्वेच्छेने दिला आहे की राजकीय दबावातून, याची तपासणी करण्याची व्यवस्था असावी, असेही म्हटले आहे.

निर्णयासाठी कालमर्यादेची मागणी

आमदारांच्या राजीनाम्यांवर आणि अपात्रतेच्या याचिकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्यात यावा. विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रता निर्णय प्रक्रियेचे संस्थात्मक पुनरावलोकन व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here