जत : जत तालुक्यात दोन दिवस तौउते चक्रीवादळामुळे पाऊस झाला. मंगळवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडला; पण बुधवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते, तर कमाल तापमान उतरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.
जत तालुक्यात मागील आठ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस सुरू झाला. तीन दिवस वळवाचा पाऊस पडल्यानंतर तौउते चक्रीवादळचा प्रभाव जाणवला. त्यामुळे दोन दिवस वारे वाहत होते, तसेच पाऊसही पडला.
तालुक्यात या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तौउते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्या नंतर मंगळवारी काही ठिकाणी ऊन पडले होते, तर अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला, तर सायंकाळच्या सुमारास थंडगार वारे वाहण्यास सुरुवात झाली होती, तर बुधवारी जत शहरासह परिसरात ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास काही वेळच ऊन जाणवले. त्यातच पाऊस झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे जत शहराचे कमाल तापमान कमी झाले आहे.यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्याने उकाडा कमी झाला आहे.