,संकेत टाइम्स : लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील कासेगाव ते जत तालुक्यातील उमदीपर्यंत पदयात्रा काढून जतच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हैसाळचे पाणी देण्याचे वचन तालुक्याला दिले होते. ते बापूंचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडून जलसंपदा खाते मागून घेऊन जतला पाणी देण्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन उमदीपर्यंत पाणी कसे नेता येईल याचा पाठपुरावा केला व संपूर्ण जत तालुक्याला पाणी देण्याचे आपल्या वडिलांचे वचन पूर्ण केले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील वंचित गावांनाही पाणी दिले. याशिवाय जत तालुक्यातील माडग्याळ येथे चाळीस बेडचे कोविड सेंटर व जतला शंभर बेडचे कोविड सेंटर मंजूर केले आहे.आमचे नेते सांगलीचे पालकमंत्री दिलेल्या शब्दाला जागणारे राज्याचे नेते आहेत,असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते विकास लेंगरे यांनी केले.
सतत मंत्री जयंत पाटील यांच्यावर बरळणारे व मागच्या दाराने आमदार झालेल्या लोकप्रतिनिधींनी आपण काय करतो व सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील काय करतात याचा जरा वेळ काढून विचार करावा ,असे श्री. लेंगरे यांनी आव्हान केले. जत, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर इत्यादी तालुक्यांना जाऊन म्हैशाळ व टेंभूचे पाणी कुणी आणले हे सर्वसामान्य जनतेला विचारावे म्हणजे आपण किती बालिश आहे ते कळेल असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास लेंगरे यांनी केले आहे.







