जत,संकेत टाइम्स : सध्या जतसह जिल्हा भरात कोरोणाच्या साथीचे रुग्ण
वाढत आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.सध्या जिल्ह्यात प्रसार माध्यमाचे महत्वाचा भाग असणाऱ्या वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेत्यांना शासनाने लसीकरण करावे,अशी मागणी क्रांतिकारी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हणंमतराव निकम यांनी केले आहे.
“कोरोना’चे संकट दूर करण्यासाठी
शासन पातळीवरून अनेक प्रयत्न होत आहेत.आपत्कालीन परिस्थितीत वृत्तपत्राचे वितरणही काही दिवस बंद ठेवण्यात आले. परंतु लोकांपर्यंत देशभरातील घटनांची योग्य माहिती पोहोचविण्याचे कार्य फक्त वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच होत असल्याचे लक्षात घेत अनेक अडचणींवर मात करीत वृत्तपत्रे घरपोच सुरू ठेवण्याची मोहीम परत एकदा गतिमान झाली आहे. राज्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरीही परिस्थितीशी सामना करीत वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी आपली सेवा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.
सध्या जगातील सर्व माहिती देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते घरोघरी वृत्तपत्र पोहच करत आहेत.त्यामुळे अशा वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुंटुंबियांना मोठा धोका वाढला आहे.जिल्ह्याभरात पोटाची खळगी भरण्यासाठी हे वृत्तपत्र विक्रेते जीव धोक्यात घालून काम करत आहेत.जिल्ह्यातील अनेक विक्रेत्यांना कोरोनाचा संसर्गही झालेला आहे.त्यामुळे शासनाने हातावर पोट असलेल्या व एकप्रकारे देशसेवाच करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र एंजन्ट, विक्रेत्यांना कोरोना लसीकरण करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.
दरम्यान,जत शहर व तालुक्यातील प्रिंट,इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियात
विविध पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत आहेत. त्या अनुषंगाने मीडियात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना व वृत्तपत्र विक्रेते यांना प्राधान्याने लस मिळावी व याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान आमदार सावंत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या जिल्ह्याच्या लॉकडाऊनच्या ऑनलाइन आढावा बैठकीत सुद्धा वरील मागणी केली. तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात आमदार सावंत यांनी म्हटले आहे की, शासनाच्या विविध योजना तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचना व माहिती पत्रकार जनतेपर्यंत पोहचवत आहेत.सध्या कोरोणाच्या महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन पत्रकार काम करीत आहेत.सध्या सांगली महापालिका क्षेत्रात सर्व पत्रकारांना व वृत्तपत्र विक्रेते यांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करावी असे पत्रात म्हटले आहे.









